प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : मातंग समाजाच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाच्या प्रलंबित मागणीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची जिल्हास्तरीय बैठक धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आगामी आंदोलनाची दिशा आणि रणनीती निश्चित करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.
बैठकीस अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष टी. अण्णा कांबळे तसेच प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी अ.ब.क.ड. उपवर्गीकरणामुळे मातंग समाजातील वंचित घटकांना न्याय मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका मांडत शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, तालुका व गावपातळीवर जनजागृती करणे तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
