प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ९ : पवनचक्कीच्या पॉईंटवरून कॉपर केबल, कॉपर रॉड, तार व इतर साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून पवनचक्कीचे चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पवनचक्की चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या पॉईंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेस्ट परिसराच्या जवळ वाहने थांबवून पायी जात कारवाई सुरू केली. पोलिसांची चाहूल लागताच झाडीमधून काही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची अभिलेखावरील गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, त्यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी पवनचक्की चोरीच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता, नंदू रामा शिंदे, रा. खामकरवाडी याने खामकरवाडी येथील त्याच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पवनचक्कीचे चोरीचे साहित्य ठेवले असल्याची माहिती दिली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ खामकरवाडी येथे जाऊन कारवाई केली. तेथून कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात अनिल नाना काळे (वय ४०, रा. मस्सा), नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी), बबलू ऊर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम ऊर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत अधिक तपास केला असता, वाशी व येरमाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पवनचक्की चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईमुळे पवनचक्कीचे मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, तसेच चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.
पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या गजाआड; ४ गुन्ह्यांची उकल, ४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
