सोलापूर, दि. २ ऑगस्ट : मराठी भाषिकांना तेलुगु भाषा सहजपणे लिहिता, वाचता आणि समजता यावी या उद्देशाने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, सोलापूर आणि हृदय स्पर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “मराठीतून तेलुगु लिहायला-वाचायला शिका” या १० आठवड्यांच्या मोफत अभ्यासक्रमाचा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच पहिल्या प्रशिक्षण वर्गालाही प्रारंभ करण्यात आला. या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी तब्बल ७४ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.
दर रविवारी सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत होणाऱ्या या अभ्यासक्रमात डिजिटल व प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमांतून प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाषा शिक्षण अधिक सोपे आणि प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या.
त्यांनी मराठी भाषिकांसाठी मराठीतून तेलुगु भाषा शिकविण्याचा हा अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे भाषिक आणि सांस्कृतिक सलोखा अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करत भविष्यात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आधुनिक सारथी मासिकाचे संपादक श्रीनिवास बुरा यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे आणि तेलुगु प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
तेलुगू–मराठी साहित्यिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कवी नरेंद्र गुंडेली यांनी वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध भाषांतील सुमारे ३५ हजार पुस्तकांच्या समृद्ध संग्रहाचे कौतुक केले. तसेच तेलुगु आणि मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व त्यांनी स्वलिखित कवितेद्वारे प्रभावीपणे मांडले.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अरविंद चीन्नी यांनी वाचनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी वाचनालयाचे संचालक आनंद वल्लाकट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर दिकोंडा यांनी केले, तर गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उद्घाटनानंतर लगेचच झालेल्या पहिल्या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षक काशिनाथ गंजी यांनी तेलुगु भाषेतील १४ स्वर (अच्चुलु) प्रात्यक्षिकासह शिकविले.
तसेच तेलुगु भाषेतील अभिवादन, स्वतःचा परिचय करून देण्यासाठी लागणारी शब्दरचना आणि दैनंदिन वापरातील सोपी वाक्ये शिकवून प्रशिक्षणार्थींना भाषेची प्राथमिक ओळख करून दिली.
या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला विनामूल्य प्रवेश, वही-पेन, डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असून अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.
या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नर्मदा गंजी, मार्गदर्शक श्रीरंग रेगोटी, तसेच श्रीनिवास वंगारी, उमेश नक्का, बाबुराव म्हेत्रे आणि मोहन सामलेटी यांचे विशेष सहकार्य लाभले. भाषिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
