धाराशिव एलसीबीची मोठी कारवाई; एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थासह दोन आरोपी जेरबंद, ११.२१ ग्रॅम ड्रग्ज जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव | दि. ४ ऑगस्ट : धाराशिव जिल्ह्यात तरुणांमध्ये वाढत असलेल्या एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ११.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धाराशिव जिल्ह्यात काही दिवसांपासून एमडी या घातक अमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळत होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले होते.


त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे पथकासह कळंब पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कळंब-येरमाळा रोडवरील पाझर तलावाजवळ सापळा रचण्यात आला.


तेथे संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या निखिल जाधव व अरविंद कांबळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात २९ पारदर्शक प्लास्टिक पुड्यांमध्ये भरलेली ११.२१ ग्रॅम वजनाची पांढऱ्या स्फटिक स्वरूपातील एमडी (मेफेड्रोन) पावडर आढळून आली.


या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२६/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


अमली पदार्थांच्या विरोधात धाराशिव पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *