प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव जिल्ह्यातील घाटंग्री येथे अनुसूचित जातीच्या मातंग समाजातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा निषेध करत मानवी हक्क अभियान संघटनेने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, न्याय न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटंग्री येथील रहिवासी संकेत कांबळे या मातंग समाजातील तरुणाला गावातीलच काही व्यक्तींनी मागील वादाची कुरापत काढत २९ मे २०२६ रोजी सार्वजनिक रस्त्यावर गाठले. पूर्वनियोजित कट रचून १० ते १२ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात संकेत कांबळे गंभीर जखमी झाले असून, त्यानंतर आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर गंभीर कलमांखाली कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मानवी हक्क अभियानाच्या जिल्हा कार्यकारिणीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलीस अधीक्षक तसेच अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सल्लागार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात संबंधित सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच पीडित तरुण व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर संरक्षण, सुरक्षा आणि शासनाकडून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मानवी हक्क अभियानाने प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, या प्रकरणात निष्पक्ष व जलद न्याय मिळाला नाही तर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, दलित संघटना आणि समविचारी संघटनांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कैलास पवार, श्रीकांत वाघे, खालीद पटेल, मोहन ताटे, अरुण माने, राजाभाऊ राऊत आणि सुग्रीव कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
