तुळजापूरात भाविकांच्या वाहनांवर बळजबरीने कर वसुलीचा आरोप; गाडी अडवून अरेरावी, ठेकेदार कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची शिंदे गटाचे उपशहरप्रमुख काकासाहेब चिंचवे (कदम) यांची मागणी

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून बळजबरीने कर वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तांदुळवाडा येथील महेश मनोहर परखन यांनी याबाबत लेखी तक्रार दाखल करत, नगर परिषद नावाखाली रस्त्यावर वाहन अडवून जबरदस्तीने कर वसूल केला जात असल्याचा आरोप केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, परखन हे आपल्या कुटुंबासह आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी वाहन क्रमांक MH-25-R-0572 ने तुळजापूर येथे आले होते. शहरात प्रवेश करत असताना काही कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून नगर परिषदेकडून कर आकारला जात असल्याचे सांगत जबरदस्तीने पावती दिली.


तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदार कर्मचारी आठणा बनपरटे यांनी 70 रुपयांची पावती देत रक्कम वसूल केली. यावेळी त्यांनी वाहनासमोर उभे राहून गाडी अडवली तसेच अरेरावीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे भाविकांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही परखन यांनी नमूद केले आहे.


या घटनेची दखल घेत शिंदे गटाचे उपशहरप्रमुख काकासाहेब चिंचवे (कदम) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात भाविकांशी अशा प्रकारे वागणे अत्यंत निषेधार्ह आहे. संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


दरम्यान, या प्रकारामुळे तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *