प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुरनूर प्रकल्प (बोरी धरण) येथील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून सध्या धरणात केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील आगामी पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा सभापती मा. सागर कदम, नगरसेवक मधुकर शेळके, पाणी पुरवठा प्रमुख महादेव शिंदे तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुरनूर प्रकल्पाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेता शहरातील नागरिकांना भविष्यात सुरळीत पाणी पुरवठा करता यावा, यासाठी सध्याची एक दिवसाआड पाणी कपात न करता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षांसमोर मांडण्यात आला आहे.
पाणी टंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच नगरपालिकेच्या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील परिस्थितीचा विचार करून प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
