तेरणानगरमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त! ६९ लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; गांजा-चरससह २१ तोळे सोने व रोकड ताब्यात

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव | तेरणानगर (ढोकी) — अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर विभागाने धाराशिव जिल्ह्यातील तेरणानगर, ढोकी येथे मोठी कारवाई करत अवैध विक्रीसाठी बाळगलेला ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि १३१ ग्रॅम चरस जप्त केला. या कारवाईत गांजा व चरससह २१ तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण ६९ लाख १९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने तेरणानगर, ढोकी येथील बाप्पा शंकर पवार यांच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान घरात ठेवलेल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. तसेच चरस, सोने आणि रोख रक्कमही मिळून आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे दुमजली आलिशान बंगला असून, या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर पत्त्यांचा क्लब सुरू असल्याचेही कारवाईदरम्यान निदर्शनास आले. तेथे जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आणि चरस आरोपीने कोठून आणला, त्याचा पुरवठा करणारे कोण आहेत आणि तो कोणाला विक्री करत होता, याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडून सुरू आहे.

या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात मोठी कारवाई झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

कारवाईतील अधिकारी व पथक

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि DYSP साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हणुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे तसेच पोलीस अंमलदार राहुल काळे, अतुल तुपे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार आणि आम्रपाली सूर्यवंशी यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *