प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
उमेश राजे निंबाळकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेत विविध पदांवर काम करताना कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला असून, ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक तसेच सहकारी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
