महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोवर चढून चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे

धाराशिव
सोलापूर–धुळे महामार्गावर धावत्या वाहनांवर चढून ताडपत्री फाडून माल लंपास करणाऱ्या चोरट्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या एका दिवसात छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


दि. २१ जून २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर–धुळे महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोवर अज्ञात चोरट्यांनी चढून ताडपत्री फाडली आणि आतील साहित्य चोरी करून नेले. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४७/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोष राजेंद्र शिंदे (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा) याला शिताफीने ताब्यात घेतले.


चौकशीदरम्यान आरोपीने अन्य साथीदारांच्या मदतीने सदर चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले ओकस्मिथ व्हिस्कीचे ९ बॉक्स, असा एकूण १,२३,३९२ रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.


अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि अमोल मोरे तसेच पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, शोभा बांगर, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *