नळदुर्ग (दि. २० मार्च २०२६) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई करत तब्बल १० कोटी ३८ लाख २० हजार रुपये किंमतीचे हशीम ऑईल (अंमली पदार्थ) जप्त केले आहे. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च २०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्री. सोळंके व पोलीस उपनिरीक्षक श्री. गिते हे आपल्या पथकासह उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन करत होते. त्यावेळी एमएच १२ जीव्ही १५१७ क्रमांकाची संशयास्पद कार दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलीस पथकाने तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, गाडीतून एका इसमाने रस्त्याच्या कडेला एक बॅग फेकून दिली. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये १० प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट-काळपट रंगाचे हशीम ऑईल सदृश अंमली पदार्थ आढळून आले. सदर पदार्थाचे वजन १०.३८२ किलो असून त्याची एकूण किंमत १०,३८,२०,००० रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यवहारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम 8(सी), 20(B)(1)(c), 25, 29 अन्वये गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक सोळंके, पोलीस उपनिरीक्षक गिते, तसेच आनंद कांगुने व इतर पोलीस पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
