प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ९ : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिन तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ध्वजारोहण, राष्ट्रगीत, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांना अभिवादन तसेच युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीमुळे काँग्रेस भवन परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक तसेच ज्ञात-अज्ञात वीरांना अभिवादन करण्यात आले.
९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक दिशा दिली. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृती जागवत स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
युवक काँग्रेसची संघटनात्मक बैठक
भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त युवक काँग्रेसची विशेष संघटनात्मक बैठक घेण्यात आली. युवकांची ऊर्जा, संघटनाची ताकद आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांच्या माध्यमातून काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
युवक काँग्रेस ही काँग्रेस पक्षाची महत्त्वाची संघटनात्मक शक्ती असून, युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच त्यांना संघटित करून लोकशाही मूल्ये, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह खलील सय्यद, प्रशांत पाटील, शिवाजी गायकवाड, मनीषा वाघमारे, विनोद वीर, मेहबूब पटेल, धनंजय राऊत, हरिदास शिंदे, वसंत मडके, जयसिंग पवार, गोरोबा झेंडे, अशोक बनसोडे, ॲड. गणपत कांबळे, शिवानंद तोरकडे, विलास शाळू, सरफराज काझी, अंकुश पेठे, अभिमान पेठे, ॲड. राजुदास आडे, बाबा मोमीन, प्रभाकर लोंढे, गणेश पवार, राजेंद्र राऊत, संजय गजधने, धवलसिंह लावंड, संकेत पडवळ, पोपट शिंदे, बालाजी राठोड, मन्सूर सय्यद, जीवन चौगुले, तानाजी जाधव, धीरज सोनवणे, हनुमंत सांगवे, बसवराज पाटील, दिलीप पवार, माणिक ढोबळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑगस्ट क्रांती दिन आणि युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा वारसा जपत संविधानिक मूल्यांचे संरक्षण व जनतेच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
