कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ९ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची भूम येथे धडक कारवाई

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव : अवैधपणे जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. भूम तालुक्यातील हाडळ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ९ गोवंशीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या

प्रकरणी एका आरोपीविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दि. १७ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, भूम शहरातील हाडळ परिसरात प्रकाश चौधरी यांच्या शेतातील मोकळ्या जागेत काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत.


मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी घटनास्थळी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसताना आखूड दोरीने निर्दयपणे वेगवेगळ्या झाडांना व लाकडांना बांधलेली ९ गोवंशीय जनावरे आढळून आली.


पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता सदर जनावरे ही मुस्तफा कुरेशी (वय ३८ वर्षे, रा. भूम, जि. धाराशिव) यांच्या मालकीची असून कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.


कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ जर्शी गायी, २ कालवडी, १ गिर गाय व १ खिल्लार अशा एकूण ९ जनावरांची सुटका केली असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. सदर जनावरे भूम पोलीस ठाण्यात आणण्यात आली.


या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(एफ) व ११(१)(एच) अंतर्गत आरोपी मुस्तफा कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे तसेच पोलीस कर्मचारी समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, महिला पोलीस शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चापोअं दहीहांडे व शेरखाने यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *