तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी; उत्साहात उपवास सोडला

Spread the love


तुळजापूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरातील जामा मस्जिद परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून उत्साहात उपवास सोडला. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमजान महिन्यात रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारची फळे, खजूर तसेच खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी अजान झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे उपवास सोडत इफ्तार केला.
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधत त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे शहरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले असून समाजात बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, संजय लोंढे, बाळू भय्ये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *