प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांना लक्ष्य करून तांब्याच्या तारा व अन्य साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दरोडा व चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात पवनचक्की प्रकल्पावर दरोड्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेत आरोपींनी दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून मारहाण केली व ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा तसेच रोख रक्कम लुटली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रमाणे जिल्ह्यात इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार १६ एप्रिल २०२६ रोजी सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, विकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी करताना सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) व विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, तांब्याच्या तारा तसेच २ महिंद्रा स्कॉर्पिओ व १ बोलेरो वाहन असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीतील अन्य साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद; ८ गुन्ह्यांचा उलगडा, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
