स्थानिक गुन्हे शाखेची अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई; चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


धाराशिव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची आतापर्यंतची मोठी कामगिरी मानली जात आहे.


दि. १३ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.


यावेळी बेंबळी ते धाराशिव जाणाऱ्या रस्त्यावरील साळुंखे नगर कमानीजवळ पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, बालाजी बबन काळे व आश्रू उर्फ भुन्या भिमा काळे हे मोटारसायकल क्रमांक एमएच २५ एयू ९४३३ वरून बेंबळीच्या दिशेने जाणार असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली.


पथकाने वरिष्ठांना माहिती देऊन दोन पंचांना सोबत घेत साळुंखे नगर कमानीजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास माहितीतील दोन्ही इसम मोटारसायकलवरून येताना दिसून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, भूम; सध्या रा. गोलेगाव पारधी पिढी, ता. भूम, जि. धाराशिव) व आश्रू उर्फ भुन्या भिमा काळे (वय ३० वर्षे, रा. जोंब, ता. भूम, जि. धाराशिव) अशी सांगितली.


पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपींकडून काळ्या रंगाची ग्रीप असलेली चार लोखंडी गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे तसेच मोटारसायकल असा एकूण २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दोन्ही आरोपींवर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कारवाईसाठी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अमोल मोरे, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चापोअं दहीहांडे, शेरखाने, पोलीस अंमलदार मुंगळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *