प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ७ जून :
धाराशिव जिल्ह्यातील विविध सोलर प्लांट व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या केबल व इतर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तब्बल १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यातील सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून वारंवार केबल व इतर साहित्य चोरीच्या घटना घडत असल्याने या गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.
दरम्यान, दि. ७ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक खुर्शीद कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे येडशी परिसरातून दोन संशयितांना त्यांच्या टाटा सुमो वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या साथीदारांसह तेरखेडा, रूईभर, काऊडगाव, ढोकी (ता. धाराशिव), साबळेवाडी व आरसोली (ता. भूम), तसेच गौरगाव व मस्सा (ता. कळंब) येथील सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या केबलची चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपींकडून सुमारे १९५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो असा एकूण ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तपासातून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवाजी उर्फ नाना संजय काळे (रा. खामकर पारधी पेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे असून, त्याच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सविन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक खुर्शीद कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश ओताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कोळी, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुखे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
