तुळजापूर : नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. ०३ तुळजापूर (खु.) येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या मेळाव्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात विविध उपक्रमांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. मंजुषा प्रसाद देशमाने, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. किरण भगवान सुरवसे, सदस्य श्री. सचिन प्रतापराव ताकमोडे, श्री. बाळासाहेब गोविंदराव केसकर, श्री. सचिन प्रकार ठेले, शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम दशरथ मोटे, शिक्षण विभाग प्रमुख श्री. अशोक बाबुराव शेंडगे, श्री. प्रविण बबन मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रसाद निवृत्ती इंगळे तसेच तहसीलदार तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील श्रीमती माया माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम, लहान मुलांच्या स्पर्धा, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ व साहित्य मांडले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. बाल आनंद मेळाव्यामुळे शाळेचे वातावरण आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या हसण्याने फुलून गेले होते.
