प्रतिनिधी : प्रतीक वाघे
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार Rajendra Raut यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या उमेदवारीबाबत जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. माजी आमदार Prashant Paricharak यांच्यासह अनेक नावांची चर्चा असतानाही अखेर पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
भाजपच्या या निर्णयामुळे बार्शी तालुक्याच्या राजकीय वजनात पुन्हा एकदा भर पडली आहे. गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामध्ये राजेंद्र राऊत यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभे करणे यामुळे त्यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर आता विधानपरिषदेची संधीही बार्शीकडे गेल्याने जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र पुन्हा एकदा बार्शीकडे झुकल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडे या मतदारसंघात स्पष्ट बहुमत असल्याने भाजपची उमेदवारी मिळणे म्हणजे विजयाची खात्री मानली जात आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विधानपरिषदेत प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्ह्यातील पक्षबांधणी आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद कायम ठेवण्याबरोबरच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न या उमेदवारीमागे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर होताच बार्शी शहरासह तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून व मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राऊत यांचे अभिनंदन करत त्यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
विशेष :
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात बार्शीचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला असून, विधानपरिषदेत राजेंद्र राऊत यांची वर्णी लागल्याने जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
