प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ७,८८३ मेट्रिक टन युरिया खत प्रकरण आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावर शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मनोज जाधव यांनी यापूर्वी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात लेखी निवेदन देत या प्रकरणात तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी केली होती. मात्र, सुमारे एक महिना उलटूनही कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कृषी आयुक्तांना देशी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
या प्रसंगी कृषी आयुक्तांनी दहा दिवसांच्या आत संबंधित माहिती उपलब्ध करून देण्याचे तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जाधव यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.
तथापि, दिलेल्या मुदतीत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. “दहा दिवसांत योग्य कारवाई झाली नाही तर थेट महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना ‘गाढव’ भेट देऊन निषेध नोंदवण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. आता या प्रकरणात प्रशासन किती गांभीर्याने कारवाई करते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
