प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : शहरात बनावट सोन्याच्या पट्ट्यांच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहीत हरीशचंद्र कदम (वय ३१, रा. बौद्धनगर, धाराशिव) यांना दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वैराग येथील बिलाल कॉलनी परिसरात मोटारसायकल क्रमांक एमएच १३ एफए ४४६० वरून आलेल्या एका अनोळखी पुरुष व महिलेने संपर्क साधला. संबंधितांनी आपल्याकडे सोन्याच्या पट्ट्या असून त्या विकायच्या आहेत, असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी कमी दरात मौल्यवान सोन्याच्या पट्ट्या देण्याचे आमिष दाखवून रोहीत कदम यांच्याकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले. व्यवहारानंतर दिलेल्या पट्ट्यांची तपासणी केली असता त्या सोन्याच्या नसून पितळ धातूपासून बनविलेल्या असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहीत कदम यांनी दि. २६ मे २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सोन्याचे व्यवहार करताना अधिकृत सराफ किंवा प्रमाणित तपासणीशिवाय व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
