प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तामलवाडी: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 15 वर्षीय तरुणीवर मागील एक वर्षापासून लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने पीडितेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका महिलेने या कृत्यास मदत केल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने 3 जून 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 65(1), 3(5) तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम 4, 6, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
