प्रतिनिधी : प्रतीक वाघे
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात वारंवार घडणाऱ्या सोन्याच्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनांची सखोल चौकशी करून प्रभावी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी जाणता राजा युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मंचाचे अध्यक्ष सुदर्शन यशवंतराव वाघमारे व सचिव अभिजीत माधवराव कुतवळ यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थान पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मंदिर परिसर, दर्शन रांग तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्रे व इतर मौल्यवान दागिने चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त उपलब्ध असतानाही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यामुळे मंदिर प्रशासन आणि पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जाणता राजा युवा मंचने पोलीस प्रशासनाकडे मंदिर परिसरात घडलेल्या सर्व चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची नियमित तपासणी करून अधिक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसविणे, साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, गर्दीच्या ठिकाणी विशेष सुरक्षा पथके तैनात करणे आणि भाविकांना सतर्कतेबाबत वारंवार सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही जाणता राजा युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
