नळदुर्ग (ता. तुळजापूर) : गंधोरा शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की संदर्भातील कामात अडथळा निर्माण करून कामगारांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये रुक्मिणी कल्लाप्पा राठोड (रा. गंधोरा तांडा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) तसेच रेणुका राजेश राठोड व राजेश राठोड (दोघे रा. खोपोली, ता. खोलापूर, जि. रायगड) यांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 16 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास गंधोरा शिवारातील शेत गट क्रमांक 284 व 285 मध्ये शासकीय आदेशानुसार पवनचक्कीचे तारे ओढण्याचे काम सुरू होते. यावेळी फिर्यादी शंकर पुंडलिक कांबळे (वय 37, नेमणूक – पोलीस ठाणे नळदुर्ग) हे शासकीय कर्तव्य बजावत होते.
दरम्यान, आरोपींनी घटनास्थळी येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार तुळजापूर यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत कामात अडथळा निर्माण केला.
तसेच कामगारांना शिवीगाळ करून दगडफेक केली व तारेने मारहाण करत जखमी केले, अशी फिर्याद देण्यात आली आहे.
या घटनेप्रकरणी शंकर कांबळे यांनी 17 मार्च 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 125, 223, 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
