प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर : महाद्वार व्यापारी संघटना, तुळजापूर यांच्या वतीने नगर परिषद तुळजापूर प्रशासनाच्या काही निर्णयांविरोधात आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यावसायिक अडचणी मांडत व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषद तुळजापूर यांनी राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम योग्य व कौतुकास्पद असून अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला महाद्वार चौक मोकळा केल्याबद्दल मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.
मात्र, महाद्वार परिसरातील बहुतांश व्यापाऱ्यांना जागेचा अभाव भासत असल्याने दुकानांसमोरील तीन फूट फूटपाथ वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित राहावा आणि आर्थिक नुकसान टळावे यासाठी दुकानांसमोर पाच फूट सायवान उभारण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली.
याशिवाय, मंदिर संस्थानमार्फत भाविक भक्तांसाठी बंद करण्यात आलेला महाद्वार प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशीही महत्त्वाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. महाद्वार मार्ग सुरू झाल्यास भाविकांना सुविधा मिळण्याबरोबरच परिसरातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायालाही चालना मिळेल, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे, नगरसेवक किरण कदम यांच्यासह अनेक व्यापारी, पदाधिकारी व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. उपस्थितांनी प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, व्यापारी संघटनेच्या मागण्यांबाबत नगर परिषद प्रशासन व मंदिर संस्थान कोणता निर्णय घेते याकडे तुळजापूर शहरातील व्यापारी, नागरिक व भाविकांचे लक्ष लागले आहे.
