प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापारावर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली असून संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. धाराशिव शहरातील ‘ओरा स्पा सेंटर’ येथे अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला.
सदर कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पंटरच्या माध्यमातून खात्री करून शासकीय पंचांसमक्ष स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान तेथे व्यावसायिक लैंगिक शोषणाचा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत एकूण पाच महिलांची सुटका (रेस्क्यू) करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रिया व पुनर्वसनासाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक आणि इतर आरोपींविरुद्ध पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंदे व अनैतिक कृत्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
