प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडलेली असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाचे उपशहराध्यक्ष किरण यादव यांनी तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले असून नियमित साफसफाई होत नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः काही वस्त्यांमध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत चालला आहे.
तसेच शहरातील पाणीपुरवठा दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. अनेक नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या असून प्रशासनाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था, खड्डेमय रस्ते आणि इतर मूलभूत नागरी सुविधांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
किरण यादव यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या मागणीमुळे तुळजापूर शहरातील नागरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून नागरिक प्रशासनाकडून त्वरित आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
