प्रतिनिधी : प्रतिक वाघे
परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद करत मोठे यश संपादन केले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलींसह एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुंभेज येथे कॅनॉललगत असलेल्या शेतवस्तीवर माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे त्यांच्या पत्नीसमवेत घरासमोर बाजेवर झोपले होते. याच वेळी काही अज्ञात दरोडेखोरांनी अचानक हल्ला चढवत विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र घटना रात्रीच्या अंधारात घडल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तपास मोठे आव्हान ठरत होता. जखमींची पत्नीही घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आरोपींचे स्पष्ट वर्णन मिळू शकले नव्हते.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी भुम विभाग श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणि आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून ही घटना अनाळा, डोकेवाडी, हिवर्डा परिसरातील कुख्यात टोळीने केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी धोकेवाडी शिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून सर्व बाजूंनी घेराव घालत आरोपींना पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
१) किरण पंडित शिंदे (रा. अनाळा)
२) राघवा निवांत्या शिंदे (रा. अनाळा)
३) ज्ञानेश्वर लिग्या काळे (रा. हिवर्डा)
४) विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी)
५) सुनील प्रकाश भोसले (रा. अंजनसोंडा)
६) चेतन किरण शिंदे (रा. अनाळा)
७) सुनील चरण शिंदे (रा. अनाळा)
यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, दोन मोटारसायकलवरून ते कुंभेज येथे गेले होते. कॅनॉलजवळ मोटारसायकली लावून शेतवस्तीवर पायी गेले. झोपलेल्या दाम्पत्याच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना विश्वनाथ जगताप यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला.
आरोपींच्या झडतीत महिलेच्या गळ्यातील तुटलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ३० हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली (किंमत १ लाख २५ हजार रुपये) असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवघ्या २४ तासांत हा दरोडा उघडकीस आणल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोनि चोरमले, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे, सुर्वे तसेच पोलीस कर्मचारी विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाडेकर, राठोड, मुळे, ववन जाधवर, रोहित दंडनाईक, विनायक दहिहंडे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
