लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी, बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love


प्रतिनिधी : प्रतिक वाघे


बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 20 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव व गाव गोपनीय) हिच्यावर दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला विविध ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.


याच दरम्यान, पीडितेने विरोध केल्यास किंवा ही बाब आई-वडिलांना सांगितल्यास तिचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सततच्या दबावामुळे पीडिता मानसिक त्रास सहन करत होती.


अखेर पीडितेने धैर्य दाखवत दि. 27 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 376(2)(i), 64(2)(एम), 69, 351(2)(3), 3(5) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कलम 4(2), 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *