प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर शहरातील कमान वेस परिसरात नगरपरिषद प्रशासनाच्या पुढाकारातून हायमास्ट लाईट सुरू करण्यात आली आहे. मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित समन्वय साधत हे काम पूर्ण केले.
कमान वेस हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून, येथे रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः वाहतुकीच्या दृष्टीने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असल्याने नागरिकांकडून हायमास्ट लाईट सुरू करण्याची मागणी होत होती.
नगरपरिषदेने या मागणीची दखल घेत तांत्रिक अडचणी दूर करून अल्पावधीतच लाईट कार्यान्वित केली. त्यामुळे परिसरात आता पुरेसा प्रकाश उपलब्ध झाला असून, नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अपघात व अनुचित प्रकारांना आळा बसण्यासही हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून नगरपरिषदेच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत असून, शहरातील इतर भागांतही अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
