ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा निव्वळ राजकीय षडयंत्र : चेतन बंडगर

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला जोर चढला असताना, या सर्व चर्चा केवळ राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तुळजापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर यांनी केला आहे.


चेतन बंडगर म्हणाले की, एखादा नेता जनतेच्या विश्वासावर सतत यशस्वी होत असेल, तर त्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा मुद्दाम पसरवल्या जातात. ओमराजे निंबाळकर हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेले खासदार असून, जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे. त्यामुळे त्यांना पक्ष बदलण्याची कोणतीही गरज नाही.


ते पुढे म्हणाले की, स्वार्थासाठी अनेकांनी पक्ष बदल केले, मात्र ओमराजे यांनी एकनिष्ठ राहूनच जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात तीन आमदार निवडून आले आहेत, ही त्यांच्या नेतृत्वाची ताकद दर्शवणारी बाब आहे.


दरम्यान, 24 तारखेला पक्ष व चिन्हाबाबत न्यायालयात सुनावणी होणार असल्याने, त्याआधीच अफवा पसरवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून वारंवार अशा चर्चा पसरवल्या जातात आणि नंतर त्या आपोआप थांबतात, असेही त्यांनी नमूद केले.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला असला, तरी मतांचे अंतर फार मोठे नसून आघाडीच्या मतांचा विचार करता महायुतीपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा किरकोळ कारणांमुळे ओमराजे निंबाळकर पक्ष सोडतील, असे नाही, असेही बंडगर यांनी स्पष्ट केले.

संघर्षातून उभे राहिलेले ओमराजे निंबाळकर हे एक लढवय्ये नेतृत्व असून, भविष्यात त्यांचा संघर्ष अधिक तीव्र होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसून येतील, असा विश्वास चेतन बंडगर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *