तुळजापूर पार्किंगमध्ये जातीवाचक शिवीगाळ करत तरुणावर हल्ला; पाच आरोपींवर गुन्हा दाखल
बातमी

Spread the love


प्रतिनिधी : प्रतिक वाघे

तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच आरोपींनी जीवघेणा हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 05 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील पार्किंग परिसरात काही तरुण एका व्यक्तीस मारहाण करत असल्याची माहिती फिर्यादी भगवान अनिल पारधे (वय 32, रा. वेताळ नगर, तुळजापूर) यांना मिळाली. त्यानंतर ते भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या आरोपींनी त्यांच्यावरच हल्ला चढवला.


आरोपी सुरज रसाळ, चिंता रसाळ, आशिष पवार, किरण गवते आणि अक्षय परमेश्वर (सर्व रा. तुळजापूर) यांनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवली व फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फायटर, लोखंडी पाईप व दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.


या घटनेनंतर जखमी भगवान पारधे यांनी दि. 08 एप्रिल 2026 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 189(2), 191(2), 191(3), 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(र), 3(1)(स) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *