महामार्गावर चालत्या वाहनातून चोरी करणारी टोळी २४ तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Spread the love


प्रतिनिधी : प्रतिक वाघे


धाराशिव : महामार्गावरून चालत्या वाहनांमधून मालाची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालवाहतूकदारांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.


मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक धाराशिव शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकास गुप्त माहिती मिळाली की, संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) हा आपल्या साथीदारांसह इंदापूर ते वाशी मार्गावरून जाणाऱ्या चालत्या पिकअप वाहनातून तेलाचे डबे चोरी करून ते स्वतःच्या घरी ठेवले आहेत.


या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ हालचाल करत संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो येरमाळा येथे सापडला. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


आरोपीने कबूल केल्यानुसार, त्याने पापा शंकर पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व आकाश देवीदास शिंदे (रा. पारा) यांच्यासह इंदापूरजवळ महामार्गावरून जाणाऱ्या चालत्या पिकअपमध्ये चढून त्यातून चार तेलाचे डबे चोरी केल्याचे उघड झाले.


पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ८,९६० रुपये किमतीचे तेलाचे चार डबे तसेच ६३,९६० रुपये किमतीची रेडिऑन कंपनीची मोटरसायकल (चेसिस क्रमांक MD625BK627MIA01176) असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच चालक पोलीस अमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *