प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : शहरातील बोंबले चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेत एका कापड व्यावसायिकावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मयुर बाळासाहेब पेंदे (वय 35, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी हर्ष बालाजी सोनंजी याच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 मे 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मयुर पेंदे हे त्यांचे चुलत भाऊ पंकज विठ्ठल पेंदे यांच्यासह कार क्रमांक MH 25 BF 7028 मधून धाराशिव रोडवरील समाधान हॉटेलकडे जेवणासाठी जात होते. यावेळी बोंबले चौक परिसरात आरोपी हर्ष सोनंजी याने त्याची मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध उभी केली होती.
वाहन बाजूला घेण्यासाठी मयुर पेंदे यांनी हार्न वाजवून इशारा केला. मात्र आरोपीने वाहन बाजूला न घेतल्याने त्यांनी गाडीची काच खाली करून “गाडी बाजूला घे” असे सांगितले. यावर संतप्त झालेल्या आरोपीने “रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आरोपीने कारवर बुक्क्यांनी मारहाण करत दहशत निर्माण केली.
वाद अधिक वाढत असल्याने मयुर पेंदे हे समजावण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी आरोपीने धक्काबुक्की करत “आता तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि खिशातून धारदार चाकू काढून त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला जोरदार वार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या कानावर व गालावरही वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी अवस्थेत मयुर पेंदे यांना प्रथम तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या पंकज पेंदे यांनाही आरोपीने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
