तुळजापूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा आरोप; महाविकास आघाडी नगरसेवकांचे निवेदन

Spread the love

दुर्गंधीयुक्त व रंग बदललेले पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

तुळजापूर : शहरातील मध्यवर्ती पाणीपुरवठ्यातून दूषित व अस्वच्छ पाणी येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांत नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही बदललेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर ही आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरी असल्याने येथे दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. शहरातील लोकसंख्या आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिक व भाविकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे अत्यावश्यक असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ तपासणी करून दूषित पाणीपुरवठा का होत आहे याची सखोल चौकशी करावी तसेच आवश्यक ती दुरुस्ती व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, रणजित चंद्रकांत इंगळे, अक्षय धनंजय कदम आणि प्रगती गोपाळ लोंढे या चारही नगरसेवकांच्या विशाल जाधव या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *