धाराशिव : पोलीस दलाच्या प्रशिक्षण व कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध सुविधा धाराशिव पोलीस मुख्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज दि. १० मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे कामकाजाची पाहणी करण्यात आली. यानंतर पोलीस मुख्यालय परिसरात चालक पोलीस कौशल्य चाचणीसाठी तयार करण्यात आलेल्या Up Gradient (रॅम्प) तसेच कवायत मैदानावरील इन डोअर फायर बटच्या नुतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
या सुविधांचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी पोलीस दलासाठी प्रशिक्षण व कौशल्यविकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, अशा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, तसेच पोलीस उपअधीक्षक श्री. मेघना आय.एन. (गृह) उपस्थित होते. याशिवाय पोलीस निरीक्षक श्री. सानप, श्री. इज्जपवार, श्री. कदम, राखीव पोलीस निरीक्षक श्री. पठाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव पोलीस मुख्यालयातील इन डोअर फायर बटचे नुतनीकरण केल्यामुळे पोलिसांना सुरक्षित वातावरणात शस्त्र हाताळणी व गोळीबाराचे प्रशिक्षण घेणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच चालक पोलिसांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी तयार करण्यात आलेला Up Gradient रॅम्प प्रशिक्षण प्रक्रियेला अधिक प्रभावी ठरणार आहे.
या नव्या सुविधांमुळे धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या प्रशिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
धाराशिव पोलीस मुख्यालयात इन डोअर फायर बट व चालक पोलीस कौशल्य चाचणीसाठी Up Gradient रॅम्पचे उद्घाटन
