धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक, तातडीने काम सुरू करण्याचा इशारा

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव : धाराशिव शहरातून सांजा–सारोळा या दिशेने जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन रस्त्याचे रखडलेले व प्रलंबित काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

धाराशिव–सांजा–सारोळा मार्गावरून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागल्याचा मुद्दाही काँग्रेसने निवेदनातून मांडला.

विशेषतः या मार्गावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खराब रस्त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. रस्त्याची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

संबंधित विभागाने तातडीने धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे रखडलेले व प्रलंबित काम सुरू करावे. तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

“नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू केले नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासोबत धीरज पाटील, धनंजय राऊत, भारत काटे, विजय वाघमारे, दिलीपराव भोकरे, सयाजी देशमुख, गुलाबराव गावकरे, सय्यद मन्सूर तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *