प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : प्रत्येक पात्र नागरिकाचा घटनात्मक मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबविले जावे, या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा संघटनेच्या वतीने चारही विधानसभा मतदारसंघांत BLA (बूथ लेव्हल एजंट) प्रतिनिधींसाठी भव्य प्रशिक्षण शिबिरे आणि संघटनात्मक बैठका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
या शिबिरांमधून “कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
२९ जून रोजी धाराशिव–कळंब आणि भूम–परंडा–वाशी, ३० जून रोजी तुळजापूर तर १ जुलै रोजी उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रशिक्षण शिबिरांना BLA प्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
प्रत्येक ठिकाणी SIR अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन, जबाबदाऱ्या आणि मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. रेखा चव्हाण आणि डॉ. स्मिता शहापूरकर यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यांनी मतदार पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्ती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्याचा घटनात्मक मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी BLA प्रतिनिधींनी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशिक्षकांनी सांगितले की, मतदार यादी हा केवळ निवडणूक प्रक्रियेतील दस्तऐवज नसून लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाचा पाया आहे.
त्यामुळे कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होऊ नये, कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ नये आणि मतदार यादी अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी प्रत्येक BLA प्रतिनिधीने गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर आणि घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक आहे.
धाराशिव येथील काँग्रेस भवनात झालेल्या प्रशिक्षण शिबिरासह भूम, तुळजापूर आणि उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघांतील प्रशिक्षण कार्यक्रमांनाही कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आगामी काळात लोकसहभागातून SIR अभियान अधिक प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रशिक्षण शिबिरे यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, BLA प्रतिनिधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध परिश्रमांचे कौतुक करण्यात आले.
जिल्हाभर SIR अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी काँग्रेस संघटना पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
