आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवाभावाने सेवा; धाराशिव पोलीस मोटर परिवहन विभागाकडून केळी व पाणी बाटल्यांचे वाटप

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांची धाराशिव पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागाने सेवाभावाने सेवा केली. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी स्वखर्चातून वारकऱ्यांना केळी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धाराशिव पोलीस विभागाने हा उपक्रम राबविला.


दि. १५ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर परिवहन विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी स्वखर्चाने केळी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.


या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी पोलीस विभागाच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. धार्मिक परंपरेसोबतच समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *