प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हद्दीतील मिलन लॉज येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर तथा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती गोळा करून कायदेशीर कारवाईसाठी 23 एप्रिल 2026 रोजी गस्त सुरू केली होती.
गस्ती दरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तामलवाडी येथील मिलन लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. खात्री झाल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकला.
छाप्यामध्ये लॉजमध्ये तीन महिला (नाव व गाव गोपनीय) आढळून आल्या. महिला पोलीसांच्या माध्यमातून चौकशी केली असता आरोपी दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय 43, रा. अविनाश नगर, एमआयडीसी सोलापूर, ह.मु. मिलन लॉज तामलवाडी) आणि संतोष नामदेव पवार (वय 40, रा. तिन्हे, ता. उत्तर सोलापूर, ह.मु. मिलन लॉज तामलवाडी) यांच्या सांगण्यावरून महिलांना व्यावसायिक उद्देशाने आश्रय देऊन लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन, पिग्मीचे छोटे पासबुक, नोंदीचे रजिस्टर, यूपीआय स्कॅनर व मशीन, मिलन लॉजचा परवाना फॉर्म, रोख रक्कम ५,७०० रुपये तसेच निरोधची पाकिटे असा एकूण २५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत संबंधित महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुरनं 60/2026 नुसार बीएनएस कलम 143, 144, 3(5) तसेच मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत 24 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, HC/232 केवटे, LHC/889 पुरी, LHC/897 नदाफ, LHC/1463 जाधव, PN/1176 माने आणि LPC/1415 दूधभाते यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
