प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त धाराशिव शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक 18 मध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक वातावरण मिळावे, या उद्देशाने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांच्या वतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे तसेच आपल्या ध्येयपूर्तीसाठी मेहनत व सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास उदयराजे निंबाळकर, प्रशांत पाटील, हरिदास शिंदे, मेहबूब पटेल, राजाभाऊ राऊत, प्रमोद चव्हाण, दत्तात्रय मुळे, विजय मुकडवार, विकास राऊत, सुरेश गायकवाड, अभिषेक बागल, मनसूर सय्यद, नसीर शेख आदी उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक शंकर घंटे, हेसगळे सर, भोईटे सर, कुर्मदास माळी, शिक्षकवृंद, परिसरातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या प्रेमळ स्वागतामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उत्साहपूर्ण वातावरणात शाळेच्या नवीन वर्षाची सुरुवात झाली.
