प्रतिनिधी : प्रतिक वाघे
भुम : गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून एका व्यक्तीस मारहाण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना भुम शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश शामराव पवार (वय ३६, रा. कल्याणनगर, भुम, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी दि. २६ मे २०२६ रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी दत्ता बिरु काळे, रावजी दत्ता काळे, सुब्राव रमेश काळे व बप्पा सवंत काळे (सर्व रा. भुम, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत वारंवार त्रास दिला.
भुम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजाच्या गुन्ह्याबाबत पोलिसांना माहिती का दिली, असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीकडे तब्बल २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून धमक्या देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ११५(२), ३५२, ३५१(३), ३२४(४), ३(५) सह ११५ (अ) / ११७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास भुम पोलीस करीत आहेत. घटनेमुळे भुम परिसरात खळबळ उडाली आहे.
