प्रतिनिधी | प्रतीक वाघे
सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये व्यस्त असताना बॅरलमधून डिझेल मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, कृषी यंत्रसामग्री तसेच इतर शेतीकामांसाठी आवश्यक असलेले डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात बॅरलमधून डिझेल खरेदीवरील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पेट्रोल पंपांपासून दूर राहत असल्याने ते शेतीच्या गरजांसाठी बॅरलमधून डिझेल खरेदी करतात. मात्र अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे डिझेल वितरणात अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत आहेत. पेरणीपूर्व मशागत, सिंचन आणि इतर कृषी कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना वेळेत डिझेल उपलब्ध झाल्यास शेतीची कामे सुरळीत पार पडतील आणि आगामी हंगामातील उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम टाळता येईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
