धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल घरफोड्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तब्बल ३२ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.


दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की अट्टल घरफोड्या आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना करण्यात आली.


माहिती मिळालेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू असताना आरोपी अजय शिंदे याने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला तसेच श्रावण जमनाशा शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अजय शिंदे याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने जिल्ह्यातील विविध घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली.


चौकशीत आरोपीने बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने एकूण ३२ घरफोड्या केल्याचे सांगितले.


आरोपीच्या ताब्यातून घरफोडीतील १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच चोरीतील काही सोने विकून मिळालेल्या पैशातून आरोपीने ब्रेझा चारचाकी वाहन आणि नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी हे वाहनांसह रोख रक्कम व इतर मालमत्ता जप्त केली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४५ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.


ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक प्रलंबित घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *