प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : धाराशिव शहरालगत तुळजापूर-बीड महामार्ग बायपास परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार क्लबवर पोलिसांनी धडक कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोकड, वाहने व जुगार साहित्य असा एकूण ३ लाख ९० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई बुधवार, दि. २८ मे २०२६ रोजी करण्यात आली.
सदर छापेमारीमध्ये परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक श्री. विजय आटोळे, QRT अंमलदार व चालक पथकाने सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळी अचानक धाड टाकत जुगार खेळणाऱ्या ११ आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रु. ३७ हजार ७७० इतकी रोकड, एक चारचाकी वाहन, दहा दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रु. ३ लाख ९० हजार ७७० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईनंतर मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू आढळल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
