“द महाराष्ट्र फाइल्स”च्या सहनिर्माती शालिनीताई राठोड यांचे तुळजापूरात आगमन; आई तुळजाभवानीचे घेतले दर्शन

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर : आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट “द महाराष्ट्र फाइल्स”च्या सहनिर्माती व सहदिग्दर्शिका शालिनीताई संजीवकुमार राठोड यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू भैय्या गंगणे, शासनाच्या तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार माया माने मॅडम यांच्या हस्ते आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन शालिनीताई राठोड यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी “द महाराष्ट्र फाइल्स” या चित्रपटासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


पत्रकारांशी संवाद साधताना शालिनीताई राठोड यांनी चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले की, “द महाराष्ट्र फाइल्स” या चित्रपटासाठी निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये अनेक नामवंत कलाकार झळकणार आहेत.


चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, नागेश भोसले, मंगेश देसाई, संजीवकुमार राठोड, आर्यन राठोड यांच्यासह लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी, विना जामकर, गौतमी पाटील, सपना चौधरी आणि सनी लियोनी यांचीही भूमिका असणार आहे. तसेच या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे संगीत लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.


शालिनीताई राठोड पुढे म्हणाल्या की, “द महाराष्ट्र फाइल्स” हा चित्रपट ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी करावा लागणारा संघर्ष आणि सामाजिक वास्तव यावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपट तयार करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. सामाजिक विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


तुळजापूर येथे झालेल्या या भेटीमुळे “द महाराष्ट्र फाइल्स” चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून चित्रपटसृष्टीतही या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *