कंडारी शिवारात केळीच्या बागेला आग; ११ लाखांहून अधिक नुकसान, आंबी पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


सामाईक बांधावरील गवत जाळताना आगीचा फैलाव; ठिबकसह उभे केळी पीक भस्मसात


धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कंडारी शिवारात गवत जाळण्याच्या प्रकारातून मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उभे केळी पीक व ठिबक सिंचन साहित्य जळून सुमारे ११ लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महारुद्र रामहारी मोरे (वय ६१, रा. कंडारी ता. परंडा जि. धाराशिव) यांनी दि. १९ मे २०२६ रोजी आंबी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार आरोपी राजेंद्र रामहारी मोरे (वय ५७, रा. कंडारी ता. परंडा जि. धाराशिव) यांनी दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०५ वाजण्याच्या सुमारास कंडारी शिवारातील शेत गट क्रमांक २९५ येथील सामाईक बांधावरील वाळलेले गवत जाळले.


मात्र, गवत जाळताना आगीने अचानक रौद्र रूप धारण केले आणि त्याचा फैलाव शेजारील शेतापर्यंत झाला. या आगीत फिर्यादी यांच्या शेतातील उभे असलेले केळीचे पीक तसेच ठिबक सिंचन व्यवस्था जळून खाक झाली. या घटनेत अंदाजे ९ लाख २५ हजार रुपयांचे केळी पीक व इतर साहित्यांसह एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा. न्या. सं. कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *