धाराशिव रोड ते महाद्वार रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; भाविकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

Spread the love


प्रतिनिधी: धाराशिव


तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर येथे दररोज राज्यासह देशभरातून हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, धाराशिव रोड ते महाद्वार रोड या मुख्य मार्गावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.


या संदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन देत सांगितले की, सदर मार्गावर काही व्यापारी व छोटे-मोठे व्यावसायिक यांनी अनाधिकृत व बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना गर्दी, अडथळे व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.


भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे असताना अतिक्रमणामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित व्यापाऱ्यांनी आपल्या मर्यादेत राहून व्यवसाय करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अतिक्रमण होणार नाही. तसेच, अतिक्रमण हटविण्याची मोहीम नियमितपणे, किमान दर चार दिवसांनी राबविण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


महाद्वारासमोरील अतिक्रमण तातडीने हटवून भाविकांना मोकळा व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी नम्र विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *