तुळजापूर शहरातील निजामकालीन शौचालयाचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेना (शिंदे गट) व जय अंबिका मंडळाचे लाक्षणिक उपोषण

Spread the love

तुळजापूर : कमान वेस परिसरातील शहर सर्वे क्रमांक 138 मधील निजामकालीन शौचालयाचे अर्धवट बांधकाम तात्काळ पूर्ण करून ते भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (शिंदे गट) व जय अंबिका मंडळ यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.


तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळ असून दररोज हजारो भाविक देवी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येथे येतात. मात्र मंदिर परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव वारंवार समोर येत आहे. विशेषतः घाटशाळ व रथ पार्किंग परिसरातील निजामकालीन शौचालयाचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.


शौचालयाची इमारत असूनही ती वापरासाठी खुली नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने तुळजापूरच्या धार्मिक पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.


या संदर्भात अनेक वेळा प्रशासन, नगर परिषद आणि संबंधित विभागाकडे निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे शिवसेना (शिंदे गट) व जय अंबिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शौचालयाचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वच्छता व्यवस्था नियमित करावी आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *