प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमीन वादातून एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शिवाजी शेळके (वय 48, रा. खामसवाडी) यांनी दि. 18 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मनिषा ज्ञानेश्वर शेळके यांच्या घरी घुसून त्यांच्या सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या वेळी घरात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मयत सुजित ज्ञानेश्वर शेळके (वय 20) पुढे आले. मात्र, जुन्या जमीन वादाच्या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात सुजित यांच्यावर चाकूने पोटात वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुजित यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादी मनिषा ज्ञानेश्वर शेळके यांनी दि. 19 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 118(1), 333, 352, 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे खामसवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
